मराठीतील प्रसिद्ध कवी (कवी मंगेश पाडगावकर)

 




मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन ‘एम.ए’ झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्षे महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काम केले. १९५३ ते १९५५ ही दोन वर्षे पाडगावकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम केले. मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले. युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस-युसीस येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर १९८९ मध्ये ते निवृत्त झाले.

६० आणि ७० च्या दशकात पाडगावकर, ‘ज्ञानपीठ’ विजेते कवी विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी झाले. पाडगावकर यांनी लिहिलेली ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ ही गाणीही खूप गाजली. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविताही विशेष गाजली होती.

दुबईमध्ये झालेल्या दुसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे पाडगावकर अध्यक्ष होते. उतारवयातही त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००८ मध्ये त्यांना राज्यातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८० मध्ये त्यांच्या सलाम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. ‘धारानृत्य’हा पाडगावकर यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात पाडगावकर यांच्या कवितेवर ज्येष्ठ कवीवर्य बा. भ. बोरकर यांचा ठसा होता. नंतर त्यांनी भावकाव्य शैलीत आणि स्वतंत्रपणे काव्यलेखन सुरू केल


‘जिप्सी’ (१९५२), ‘छोरी’ (१९५४), ‘उत्सव’ (१९६२), ‘विदुषक’ (१९६६), ‘सलाम’ (१९७८), ‘गझल’ (१९८३), ‘भटके पक्षी’ (१९८४), ‘बोलगाणी’ (१९९०) हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. पाडगावकर यांनी ‘गझल’, ‘विदुषक’, ‘सलाम’ या काव्यसंग्रहातून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता केली. सत्तेच्या संपर्कात राहणार्‍या वर्गातील लोकांनी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील माणसांचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांमध्ये आलेली लाचारी, दांभिकता याबद्दल पाडगावकर यांच्या मनात संताप होता तो या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला. १९६० नंतरच्या वास्तवावर भेदकपणे प्रकाश टाकणारी पाडगावकर यांची कविता नवसमृद्ध वर्गाची, त्याच्या संवेदनाहीन मनाची चिरफाड करून वाचकांना अंतर्मुख करते. पाडगावकरांची कविता सादर करण्याची एक विशेष ढब होती. त्या ऐकताना श्रोते जसे खळखळून हसत तसेच मंत्रमुग्धही होत असत. शाळा कॉलेजांमधील पाठ्यपुस्तकांमध्येही पाडगावकरांच्या कविता होत्या.

‘बोलगाणी’ हा पाडगावकर यांनी काव्यरचनेवर केलेला एक वेगळा प्रयोग आहे. मीरा, कबीर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवादही पाडगावकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले होते. पाडगावकर यांचे ‘भोलानाथ, ‘बबलगम’, ‘चांदोमामा’ हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. १९६४ मध्ये प्रकाशित झालेला ‘वात्रटिका’हा त्यांचा कवितासंग्रह पाडगावकर यांची एक वेगळी ओळख करून देणारा ठरला आहे. पाडगावकर यांनी ‘बायबल’ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता. अशा या थोर कवीचे 30 डिसेंबर 2015 रोजी निधन झाले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नदी प्रदूषण: कारणे व परिणाम

मराठीतील प्रसिद्ध कवि (माडगूळकर गजानन दिगंबर )